मित्रहो, नुकताच आयसी-३ म्हणजे इंटरनेट
क्राईम कंप्लेंट सेंटर व सीमँटेक या दोन संस्थांनी सन २०१२ चे संगणकीय
गुन्हेगारीसंबंधीचे त्यांचे अहवाल सादर केले आहेत.
इंटरनेट क्राईम कंप्लेंट सेंटर (आयसी-३)
ही जगभरातील सायबर क्राईम नोंदविण्यासाठी स्थापन झालेली संस्था
असून,त्यांचे मूळ ध्येय हे संगणकीय गुन्हेगारीने त्रस्त व्यक्तीला मदतीचा
एक हात देणे हे होय. सीमँटेक ही जगप्रख्यात व्यापारी संस्था असून,त्यांचे
कार्य मुख्यत्वे संगणकीय सुरक्षेबाबत विविध सॉफ्टवेअर्सचा पुरवठा करणे हे
आहे.
आपण या भागात आयसी-३ च्या अहवालावर चर्चा
करणार आहोत. सन २०१२ मध्ये या संस्थेमध्ये २८९४७४ तक्रारी दाखल करण्यात
आल्या व ज्या द्वारे साधारणत: ५२५४४१११० डॉलर्सचे नुकसान झाले असावे, असा
अंदाज आहे.ही नुकसानी मागील वर्षाच्या म्हणजे २०११ च्या तुलनेत ८.३ टक्के
वाढली आहे.
यावरून आपणांस अंदाज येईल की, संगणकीय
गुन्हेगारीमुळे किती प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते व जे
टाळण्यासाठी आम्हाला संगणकीय व्यवहारकर्त्यांना सतर्क करणे किती जरुरी
आहे.भारत आयसी-३ या प्रणालीचा अजून वापर करीत नसल्यामुळे या नुकसानीचा आकडा
फार मोठा आहे, याचा वाचकांना अंदाज यावा.
आयसी-३ या संस्थेमार्फत तक्रार साधारणत:
तीन वेगवेगळ्या स्तरांवर हाताळली जाते.तक्रार दाखल झाल्यानंतर ती पोलिस वा
तत्सम तपासयंत्रणांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येते.दुसर्या स्तरावर
तिचा वापर म्हणजे त्या तक्रारीतील मूळ कारणाचा इतर व्यक्तींच्या
जागरूकतेबाबत करण्यात येतो.म्हणजेच वर्तमानपत्राद्वारे किंवा वेबसाईटद्वारे
‘मोडस ऑपरेंडी’ किंवा गुन्ह्याच्या पद्धतीची आम जनतेला माहिती देण्यात
येते किंवा गुन्ह्याचा प्रकार विशिष्ट क्षेत्राशी (उदा. बँकिंग) संबंधित
असेल, तर त्या क्षेत्रात त्याची माहिती प्रसारित केली जाते. तिसरा स्तर
म्हणजे त्या गुन्ह्याच्या पद्धतीवर व परिणामांवर व्यापक विचार केला जातो व
त्यावर काय उपाययोजना करायची, याबाबत सखोल चर्चा करण्यात येते.
मित्रहो, या आयसी-३ च्या त्रिसूत्री
कार्यक्रमात व आमच्या इथे राबविल्या जाणार्या उपाययोजनांत किती फरक आहे,हे
जरा जाणून घेऊ या. आयसी-३ च्या पद्धतीनुसार तिथे येणारे सर्वच गुन्हे
नोंदविल्या जातात. याच्या अगदी उलट म्हणजे भारतातील संगणकीय गुन्हेगारी
तपासव्यवस्था आहे.खालील काही उदाहरणांवरूनच आपणांस लक्षात येईल की, दोन्ही
तपासयंत्रणांच्या कार्यप्रणालीत किती जमीनअस्मानाचा फरक आहे :
१) समजा तुम्हाला एखादा खोटा वाटणारा ई-मेल आला व जर तुम्ही तक्रार नोंदवायला पोलिस ठाण्यात गेला,तर काय ते तक्रार नोंदवून घेतील?
२) तुम्हाला लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा
एसएमएस येतात. याबाबत तक्रार करायला तुम्ही कधी पोलिस ठाण्यात गेला आहात
काय? जाऊन बघा काय परिणाम होतो?
३) तुम्हाला एखाद्या वेबसाईटबाबतची संपूर्ण माहिती मिळत नाही. काय याबाबत तुम्ही पोलिसांकडे तक्रार दखल करू शकता?
४) वेबसाईट्सवर किंवा एसएमएसद्वारे
कितीतरी नागरिक बनावटी आश्वासनांना फसून पैसे गुंतवितात. या बाबत पोलिस
ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी जाऊन बघा, काय परिणाम होतो ते.
मित्रहो, मला आपणांस आंतरराष्ट्रीय
स्तरावर व आमच्या देशात संगणकीय गुन्ह्यांच्या नोंदणीबाबत व त्याच्या
तपासाबाबत किती विरोधाभास आहे, हे आपल्या निदर्शनास आणून द्यायचे आहे.
भारतातील आकडेवारी द्यायची झाली, तर
आमच्या येथे जर १०० संगणकीय गुन्हेगारीच्या प्रकारात मोडणारे गुन्हे
असतील, तर फक्त २० व्यक्ती गुन्हे नोंदविण्यास पोलिस ठाण्यापर्यंत
पोहोचतात. त्यातील १० व्यक्तीच त्यांचे गुन्हे नोंदविण्यात सफल होतात व
त्यातीलही फक्त एक वा दोन गुन्हे हे माहिती तंत्रज्ञान कायदा वा त्याच्याशी
निगडित कायद्यांतर्गत नोंदविल्या जातात.
मित्रहो, हा जर आमच्या येथील संगणकीय
गुन्हेगारीबाबतचा आमच्या तपासयंत्रणांचा दृष्टिकोन आजही आहे, तर येणार्या
किती कालावधीत तो बदलू शकेल, याचा आपणच विचार करा.
आता या एक वा दोन गुन्ह्यांसाठी आमची
तपासयंत्रणा किती प्रयत्न करत असावी, ते सांगण्याची गरज नाही. आपल्या
निदर्शनास आणण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संगणकीय गुन्हेगारीबाबत आम्ही
विचारमंथन केले नाही, तर त्यावर उपाययोजना तरी काय करणार? मित्रहो, जुनी
म्हण आहे, ‘कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही.’ हीच म्हण येथे
तंतोतंत लागू होते.आमच्या देशात कितीही प्रयत्न केला गेला की, संगणकीय
गुन्हेगारी होतच नाही, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्व आलबेल आहे, तरी
येणार्या काळात याचे परिणाम आम्हाला भोगावे लागणारच आहेत.
आम्ही संगणकीय गुन्हेगारीपासून आमचे
अज्ञान जेवढे लपवायचे प्रयत्न करू तेवढेच आम्हाला नुकसान जास्ती होणार आहे
आणि म्हणूनच आयसी-३ च्या विचारप्रणालीनुसार संगणकीय गुन्हेगारीबाबत सर्वच
स्तरातून विचारमंथन होणे फार गरजेचे आहे. जेव्हा अशा प्रकारचे मंथन होईल,
तेव्हाच काही प्रतिबंधात्मक उपाययोजनाही यातून बाहेर येतील. त्याद्वारे
सर्वांचेच भले होईल.
आहे विषय माहिती तंत्रज्ञान
याची खोली अथांग
सांभाळून कर वापर
एवढेच तू जाण!
ऍड. महेंद्र लिमये
९४२२१०९६१९