Thursday, June 6, 2013

अहवाल IC ३ चा

अहवाल IC ३ चा

तारीख: 06 Jun 2013 12:10:05

- मित्रहो, मागील भागापासून आपण IC3 या संस्थेच्या अहवालाबाबत माहिती जाणून घेत आहोत.इंटरनेट क्राईम कंप्लेंट सेंटर अर्थातच IC3 या संस्थेचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर जगभरात सायबर क्राईम किंवा संगणकीय गुन्हेगारीबाबत नव्याने चर्चा सुरू होते. मागीलभागात आपण गुन्हा नोंदविल्यानंतर IC3 मार्फत काय उपाययोजना केल्या जाते व भारतात काय उपाययोजना होते याबद्दल माहिती जाणून घेतली.
 आता या भागात आपण त्यांनी प्रकाशित केलेल्या आकडेवारीवर नजर टाकूया. सन २०१२ मध्ये या संस्थेकडे २८९८७४ तक्रारी दाखल झाल्या व त्याद्वारे सुमारे ५२५४४११० डॉलर्सचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे; म्हणजेच साधारणत: १८१३ डॉलर्स (१ लक्ष रुपये) प्रती तक्रार नुकसान झाले आहे. मित्रहो, समजा एकलक्ष रुपये प्रती तक्रार असा जर अंदाज बांधला तर आमच्या देशात याची परिस्थिती काय असेल व आमच्या देशात या संगणकीय गुन्हेगारीद्वारे किती अब्ज रुपयांचे नुकसान होत असावे याची नुसती कल्पना जरी केली तरी या गुन्हेगारीचे भयंकर स्वरूप तुमच्या लक्षात येईल.
 एकूण तक्रारकर्त्यांपैकी साधारणत: ५१ टक्के पुरुष तर ४९ टक्के महिला आहेत म्हणजेच संगणकीय गुन्हेगार हे स्त्री-पुरुष असा भेद मुळीच मानत नाही आणि याचे कारण म्हणजे मुळात गुन्हेगाराला व्यक्तीविरुद्ध गुन्हा करायचा नसून तो गुन्हा हा संगणक हाताळणाच्या विरुद्ध केलेला असतो.
 हे गुन्हे बहुतांशी पैश्याशी संबंधित असल्यामुळे तक्रारकर्त्यांमधे ४ टक्के फक्त २० वर्षांच्या आतील आहेत. २०-४० यांचे प्रमाण ४० टक्के तर ४० ते ६० वयोगटाचे प्रमाण ४३ टक्के आहे. उरलेले १३ टक्के हे ६० वयोगटाच्या पुढील आहेत. म्हणजेच विशीच्या आतील (कारण त्यांच्या हाती कमी पैसा असतो) व ६० च्या वरचे (कारण हे अनुभवाने शहाणे झाल्यामुळे संगणकीय प्रणालीवर अविश्‍वास ठेवतात) संगणकीय गुन्हेगारीपासून थोडेबहुत सुरक्षित आहेत.
 मित्रहो, या आकडेवारीवरून असाही निष्कर्ष काढल्या जाऊ शकतो की, बहुतांशी लोकांची संगणकीय माध्यमांद्वारे आर्थिक फसवणूक केल्या जाते. आता संगणक हाताळणारे बहुतांशी लोक हे सुशिक्षित या प्रकारात मोडतात. मग जर सुशिक्षित लोक जास्तीत जास्त आर्थिक फसवणुकीला बळी पडतात याचा अर्थ असाही लावू शकतो की गुन्हेगारी यात अधिक हुशारीने त्यांचे फासे टाकत असावे. कारण जर सुशिक्षित व्यक्तीला म्हणजेच संगणक हाताळणार्‍या व्यक्तीला ते फसवू शकतात तर ते कोणालाही सहज फसवू शकतात. आता यामध्ये प्रामुख्याने ज्या पद्धती किंवा मार्ग वापरल्या जातात ते आपण पाहुया.
 ऍटो फ्रॉड : यामध्ये गुन्हेगार हे अशा वाहनांच्या जाहिराती करतात की जे त्यांचे स्वत:चे नाही. वेगवेगळ्या संकेतस्थळाद्वारे अतिशय आकर्षक अशा जाहिराती केल्या जातात. म्हणजे विक्रेता २ दिवसात देश सोडून जाणार आहे आणि म्हणून मातीमोल किमतीत वाहन विकायला निघाला आहे किंवा विक्रेत्याला वैद्यकीय उपचारांसाठी पैश्याची तात्काळ गरज आहे आणि म्हणून इतक्या कमी भावात व रोखीने व्यवहार त्वरित उरकायचा आहे किंवा विक्रेता हा एक सैनिक असून त्याला आता देशसेवेसाठी दुसर्‍या देशात जावे लागते आहे किंवा अशाच प्रकारचे कोणतेही कारण जे तुम्हाला भुरळ घालण्यास यशस्वी ठरू शकते, ते अशा जाहीरातींसाठी वापरण्यात येते. या पद्धतीच्या गुन्ह्यांचा दुसरा भाग म्हणजे हे गुन्हेगार तुम्हाला प्रत्यक्ष वाहन कधीच दारात नाही. तुम्हाला फक्त फोटो किंवा एखादे क्लिपिंग पाठविण्यात येते. तुम्ही प्रत्यक्ष वाहन तपासण्याची मागणी केली तर ते तुम्हाला असे स्थळ सांगतात की जेथे तुम्ही एकतर पोहचू शकत नाही आणि जर पोहचलाच तर ते वाहन शोधू शकत नाही.
 गुन्ह्यांच्या तिसरा भाग म्हणजे तुमच्याशी फक्त ई-मेल अथवा चॅटद्वारेच संवाद साधल्या जातो. फार क्वचित देश मोबाईलद्वारे संभाषण घडू शकते. यातील अजून नवीन भाग म्हणजे बर्‍याच वेळा ही रक्कम एका तिसर्‍याच व्यक्तीच्या खात्यात जमा करायला सांगण्यात येते. जेणे करून तुमचा विश्‍वास बसावा की यात कोणी अजून ‘खात्रीलायक’ व्यक्ती सहभागी आहे. हा खात्रीलायक व्यक्तीही याच टोळक्याशी निगडीत असते.
 आता या गुन्हेगारीचा नवीन कल्पनाविलास पहा. आजकाल हे ऍटो फ्रॉड करणारे गुन्हेगार स्वत:ला डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर असल्याचे भासवून नवीन वाहनेही आगाड रक्कमे भरून देण्याची हमी देतात.
 मित्रहो, आपणास या गुन्हेगारीपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर खालील दिलेली सुरक्षा तत्त्वे नेहमी आठवणीत ठेवा.
 १) संकेतस्थळांमार्फत कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर प्रथमत: त्या संकेतस्थळाच्या ‘फिजिकल लोकशन’ किंवा ‘प्रत्यक्षात अस्तित्वाची’ चौकशी किंवा शहनिशा करा.
 २) त्या संकेतस्थळावर कोणता दूरध्वनी क्रमांक आहे का याची खात्री करा व त्या दूरध्वनी क्रमांकावर दूरध्वनी करून स्वत:ची खात्री पटवून घ्या.
 ३) कोणतीही वस्तू संकेतस्थळामार्फत खरेदी करण्यापूर्वी त्या संकेतस्थळांवर दिलेल्या ‘अर्टी व शर्ती’ निट वाचून, समजून घ्या. अन्यथा तुम्ही त्या शर्ती व अटी स्वीकारल्या तर तुमचेच नुकसान ओढवू शकते.
 ४) कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी ज्या खात्यात रक्कम टाकता त्या खात्याबाबत संबंधित बँकेकडून योग्य ती खातरजमा करून घ्या.
 ५) कोणत्याही संकेतस्थळावरून खरेदी करण्यापूर्वी त्या संकेतस्थळाबाबत काही तक्रारी तर नाही ना याची माहिती करून घ्या.
 मित्रहो, अशा बर्‍याच गुन्ह्यांची चर्चा आपण पुढील भागातूनही करणार आहोतच. तेव्हा सध्यातरी या सूचनांचा योग्य प्रकारे वापर करून आपली सुरक्षा करा.
 ऍड. महेंद्र लिमये
 ९४२२१०९६१९

.......

No comments:

Post a Comment